*काम बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम*
साकळी ता.यावल।वार्ताहर राजु पिजारी- बहुप्रतिक्षित असलेले साकळी गाव ते बस स्टॅन्ड रस्त्याचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी युद्धपातळीवर सुरू झाले होते. रस्त्याचा एक पदर तयार झालेला असून एक भाग बाकी आहे. एकूणच गेल्या काही दिवसांपासून सदरचे काम अचानक बंद असल्याने कामाला का ‘ब्रेक’ लागला ? असा प्रश्न परिसरवासीयांना पडलेला असून रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत असून या रस्त्यावरून पायी चालणे ही कठीण बनले आहे.तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यात येऊन ते पूर्ण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, गेल्या अनेक वर्षांपासून साकळी गाव ते बस स्टॅन्ड या एक किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते.रस्त्याचा भाग काही ठिकाणी खोलगट असल्याने पावसाचे पाणी या रस्त्यावर गुडघाभर साठवून या रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. रस्त्यावरील साठलेल्या पाण्यात खड्डे असल्याने चालत्या वाहनाला केव्हा अपघात होईल हे मात्र काळच ठरवित होता.एकूणच या रस्त्याची फार मोठी गंभीर व जीवघेणी समस्या होती. दरम्यान या रस्त्याचे गेल्या काही काळापासून मंजूर झालेले होते व या कामासाठी शासनाकडून जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर होता मात्र काही संबंधित कार्यालयाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम सुरू व्हायला विलंब होत होता. त्यामुळे पायी चालणाऱ्या व वाहनधारकांना या रस्त्याने वापरताना खूप त्रास सहन करावा लागत होता.खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात सुद्धा व्हायचे. या समस्येला वाचा फुठावी व रस्त्याचे काम लवकरात- लवकर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल शाखेकडून यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देण्यात आलेले होते व या पत्रात दिलेल्या कालावधीत काम सुरू झाल्यास ‘मनसे स्टाईल ‘ आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता. दरम्यान या निवेदनाची दखल होऊन संबंधित विभागाकडून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आणि थेट साकळी बायपास रस्ता ते महात्मा फुले चौकापर्यंत या रस्त्याची एक बाजू काँक्रीटीकरण करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामात दुसरी बाजू जोडण्यासाठी लोखंडी असणाऱ्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहे व काँक्रीटीकरणाचेचे कामही मजबूत होत आहे. मात्र रस्त्याचे काम अचानक बंद झाल्याने रस्त्याची दुसरी बाजू काँक्रिटीकरण करण्याची राहून गेली आहे त्यामुळे एकच रस्ता सुरू असल्याने ‘वन- वे ‘ मार्गाने पायी चालणाऱ्या व वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना खूप मोठ्या अडचणी येत आहे. मोठे वाहने समोरासमोर आल्यास कोण अगोदर जाणार यावर वाद होत असतात.कारण काम राहिलेली दुसरी बाजू ही वापरासाठी पुरेशी नाही. त्याचप्रमाणे खड्डे असल्याने अनेक छोट्या -मोठ्या वाहनांना अपघात सुद्धा होत आहे.त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला आडव्या आसाऱ्या असल्याने नागरिकांना वापरताना सावधानतेनेच वापरावे लागते. काही वाहने तर चक्क उंच ओट्यासारख्या झालेल्या रस्त्याच्या कामावरून कसेबसे जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.एकूणच हा अर्धवट रस्ता नागरिकांच्या वापरासाठी ‘डोकेदुखी ‘ बनलेला आहे. रस्ता हा गाव परिसराचा वापराचा मुख्य मार्ग असल्याने इलाजास्तव याच रस्त्याने सर्वांना वापरावे लागते. या रस्त्याच्या कामाला गेल्या काही दिवसापासून ‘ ब्रेक ‘ का लागला ? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून अचानक बंद पडलेल्या कामामुळे परिसरात संतप्त भावना सुद्धा उमटत आहे. एकूणच या रस्त्याची समस्या लक्षात घेऊन तसेच रस्ता परिसराचा मुख्य वापर असल्याने रस्त्याचे काम लवकरात- लवकर पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.