जळगाव : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्चत कृषि योजनेंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतक-यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी अर्ज नोंदणी बाबत कार्यालय स्तरावरुन मोहिम राबविण्यात येत आहे.

३० नोव्हेंबर ते दि.१४ डिसेंबर या कालावधीत कार्यालय स्तरावरुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरुन अर्ज रद्द होणार नाही. तरी जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुरबान तडवी यांनी केलेले आहे.

अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक आहे. यासोबतच आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद ७/१२ उता-यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ. बाबत स्वयंघोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ ५ हेक्टर पर्यंत देण्यात येईल. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतक-यांना लघु संदेशाव्दारे कळविण्यात येणार आहे. पूवसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल, संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकांमार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

admin

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *