दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अस्थिरता आल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. याचा परिणाम राज्यसह पालघर लोकसभा मतदारसंघावरही झाला आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी साम, दाम, दंड, भेद नितीमुळे शिंदे गटाच्या वळचणीला गेले आहेत. खरे शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हार न मानता भारती कामडी याना मैदानात उतरवलेआहे. उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती व शिवसैनिकांची पाठराखण, या बळावर भारती कामडी यांनी मतदारसंघात चांगल्यापैकी वातावरण निर्मिती केली आहे. प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर प्रकरणी स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ.हितेंद्र ठाकूर यांनीही तशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजप अडचणीत आला आहे. भाजपने वाढवण बंदरासंदर्भात मच्छिमार समाजाच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. मात्र मच्छीमारांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. मच्छिमारांच्या या नाराजीचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकरता येत नाही.
यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तिन्ही प्रमुख पक्षांनी त्यांच्या प्रचारात वास्तविक जिल्ह्याचा मागासलेपणा,आदिवासी समाजाचे राहणीमान, रोजगार, शिक्षण,आरोग्य व वैद्यकीय सेवा, कुपोषण, ग्रामीण भागातील रस्ते, बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, विद्यार्थ्यांची गळती, आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, घटते कृषी क्षेत्र, दरवर्षी शेतीचे होणारे नुकसान व पीक विमा लाभ देण्यात होणारा हलगर्जीपणा, ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाई व भूमीपुत्रांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्प, आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींकडे हस्तांतारांनात मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ़, औद्योगिक क्षेत्रातील असंघटित कामगार व त्यांच्या समस्या इ. मुद्द्याला एकाही उमेदवाराने हात घातला नाही. गेले अनेक वर्षे हे सारे प्रश्न प्रलंबित आहेत. रोजगाराच्या प्रश्नावरही या उमेदवारांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या दिवशी फारसा उत्साह पाहायला मिळणार नाही असा अंदाज वर्तवला जातं आहे. जिल्ह्यात वाढते तापमान व मतदारांचा निरुत्साह अशा दोन कारणामुळे मतदान 55 ते 60 % इतके होईल, असा अंदाज आहे.